दवर्लीत पक्ष कार्यकर्ते प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून देतील : आमदार दिगंबर कामत
प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार परेश नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक व ऍड. नरेंद्र सावईकर, प्रदेश सचिव सर्वानंद भगत, द. गोवा भाजपचे सरचिटणीस सत्यविजय नाईक, मडगावच्या उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, नगरसेवक दामोदर शिरोडकर व महेश आमोणकर, आपें बायशचे सरपंच अविनाश सरदेसाई, भाजपचे नेते शेख जीना आदी यावेळी उपस्थित होते.
या मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार उल्हास तुयेकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱया जिल्हा पंचायत सदस्याची आवश्यकता असून परेश नाईक हे त्यासाठी योग्य उमेदवार आहेत, असे आमदार कामत यांनी सांगितले. भाजपचे सर्व कार्यकर्ते एकसंध राहून जोमाने प्रचार करतील व परेश नाईक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधक व त्यांचे कार्यकर्ते केवळ निवडणुकीपुरतेच अस्तित्व दाखवतात, तर भाजपचे कार्यकर्ते सतत लोकांमध्ये राहून काम करतात. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सदैव सज्ज असतात. भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या विकासकामांची पावती म्हणून मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी गाफील न राहता सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आमदार तुयेकर यांनी केले.
दवर्ली जि. पं. मतदारसंघात भाजपची विजयी परंपरा याखेपेसही कायम राहील, असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला. आमदार, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य व सरपंच, पंच सरकारसोबत राहिल्यास मतदारसंघाचा सुरळीत व सूत्रबद्धरीत्या विकास होतो, असे नाईक यांनी पुढे सांगितले. परेश नाईक यांचा विजय निश्चित आहे. पण सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य केले, तर प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल, असे सावईकर यांनी सांगितले.
रुमडामळ दवर्लीचे पंच विनायक वळवईकर, विजय सुरमे, सफिया शेख, दवर्ली दिकरपालचे पंच साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्लेकर, संपदा नाईक, संतोष नाईक, आकें बायशचे पंच रामदार उसगावकर, सुनीता नाईक, प्रदीप आचार्य, मिलिंद साळुंखे, भाजपच्या नावेली महिला मोर्चाच्या अध्यक्षा मधुकला शिरोडकर व भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.