मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन
प्रतिनिधी /मडगाव
माजोर्डा येथील ‘हाफ वे होम’ या वृद्धाश्रमाचे पुढील 200 वर्षे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक असिस्टन्स (प्रोव्हेदोरिया) तर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला प्रोव्हेदोरियामंत्री सुभाष शिरोडकर तसेच नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नुवेचे आमदार आलेक्स सिकवेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून योग्य निर्णय घेतला आहे. नुवे मतदारसंघातील लोकांना त्यांच्या आमदाराने योग्य निर्णय घेतल्याचा अभिमान वाटला पाहिजे. आगामी काळात नुवे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल, असे माझे जनतेला वचन आहे. सिक्वेरा यांचा राजकारणातील अनुभव सरकारला राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नक्कीच मदत करेल.‘सरकारने या वृद्धाश्रमाच्या नूतनीकरणावर खूप पैसा खर्च केला आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा गरजूंना नक्कीच फायदा होईल. या वृद्धाश्रमाचे सरकार पुढील 200 वर्षे संरक्षण करेल आणि हे माझे आश्वासन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना मंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्रोव्हेदोरिया संचलित वृद्धाश्रम लवकरात लवकर अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. आमदार सिक्वेरा म्हणाले की, माजोर्डा आणि लोटली येथील वृद्धाश्रमांमध्ये मोठा फरक आहे.