मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आराग्यमंत्री विश्वजित राणे यांची प्रमुख उपस्थिती
विशेष प्रतिनिधी/ पणजी
सत्तरी तालुक्यातील पैकुळ मेळावली येथील रगाडा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून उद्या सोमवारी या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या नदीवर यापूर्वी एक अरुंद पूल उभारण्यात आला होता. इ.स. 2021 मध्ये जुलै महिन्यात आलेल्या महापुरात सदर पूल वाहून गेला होता. गोवा सरकारने या जागी नवा मोठा व रुंद पूल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलासाठी एकूण रु. 13.27 कोटी खर्च अपेक्षित होता. प्रत्यक्षात 11.98 कोटी रुपयांमध्ये ते मे. सुरभी एंटरप्राईझेस या कंपनीने उभारला. 9 महिन्यांत हा पूल पूर्ण करण्यास सांगितला होता. परंतु, कंपनीला काही तांत्रिक कारणामुळे थोडा विलंब लागला. हा पूल 3 जून 2023 रोजी बांधून पूर्ण झाला.
42.50 मीटर्स लांबीच्या दोन कमानी उभारून 85 मीटर्सचा हा पूल गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाने उभारलेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला 85.90 मीटर्सचे जोडरस्ते उभारण्यात आलेले आहेत. 7.5 मीटर्स रुंदीच्या या पुलामुळे सावर्डे, पैकुळ, मेळावली या गावांनासुद्धा लाभ होणार आहे.