प्रतिनिधी /बेळगाव
अथर्व फौंडेशनतर्फे टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. शहरी भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन कडोलकर गल्ली, बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके व डॉ. उदय साठे यांनी फीत कापून उद्घाटन केले.
यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले, आजकाल शहरात कोणीही एक इंचसुद्धा जागा सोडत नाही. अशा परिस्थितीत डॉ. उदय साठे यांनी चांगल्या कामासाठी आपली जागा मोफत दिली, हे आदर्शवत आहे. अथर्व फौंडेशनने ना नफा, ना तोटा या तत्त्वावर चालविलेल्या या केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नितीन कपिलेश्वरी यांनी स्वागत केले. लॅब प्रकल्पाचे मुख्य डॉ. श्रीकांत विरगे यांनी आमदारांचा सत्कार केला. अथर्वचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लॅबच्या कार्याचा आढावा घेतला. चिटणीस संतोष चांडक यांनी आभार मानले. यावेळी डॉ. समीर बागेवाडी, हरिकिशन ठक्कर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.