माजी नगरसेवक, बिल्डरची चौकशी
प्रतिनिधी / मडगाव
आयकर विभागाने काल बुधवारी फातोर्डा येथे तीन ठिकाणी छापे मारले. हाऊसिंग बोर्ड, घोगळ परिसरात दोन ठिकाणी तर मनोविकास हायस्कूलजवळ एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले. छापे टाकण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये मडगाव नगरपालिकेचा माजी नगरसेवक असून दुसरा बिल्डर आहे. या दोन्ही व्यक्ती एका राजकारण्याच्या जवळच्या मानल्या जातात. या छाप्यात आयकर विभागाच्या हाताला नेमके काय लागले, या संदर्भातील माहिती मात्र उलपब्ध होऊ शकली नाही.
बुधवारी सकाळी हे छापा सत्र सुरू होऊन ते उशिरापर्यंत चालू होते. छापा सत्र सुरू असताना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छापा मारण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘पीएफआय’शी संबंधित असल्याचीही चर्चा आहे.
या छाप्यासंदर्भात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, कुणीच माहिती देण्यास तयार नव्हते. आयकर विभागाने काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केल्याचे वृत्त आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम ताब्यात घेतल्याचे वृत्त असले तरी त्याला अधिकृत दुजारो मिळू शकलेला नाही.
‘फातोडर्य़ातील कचरा साफ करू’ची ही सुरवात का?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच मडगावात भाजप मेळाव्यात बोलताना ही आमची सुरवात असून फातोडर्य़ातील कचरा साफ केला जाईल, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी जरी कुणाचे नाव त्यावेळी घेतले नव्हते तरी त्यांचा रोख हा फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर असल्याचे मानण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर दोन दिवसांनीच आयकर विभागाने छापे टाकल्याने, त्यांचा संदर्भ काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फातोडर्य़ातील कचरा साफ करण्याची ही सुरवात तर नव्हे ना अशी प्रतिक्रीया देखील फातोडर्य़ात व्यक्त होऊ लागली आहे.