वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जानेवारी-मार्च तिमाहीत किरकोळ विक्रेत्यांच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, ट्रेंट, शॉपर्स स्टॉप, टायटन आणि अव्हेन्यू सुपरमार्ट्स यांच्या महसूलात मजबूत वाढ दिसून आली असल्याची माहिती आहे. ट्रेंटचे अध्यक्ष नोएल एन टाटा म्हणाले की, विविध संकल्पना, योजनांच्या ऑफरमुळे वस्तुंच्या विक्रीत जोरदार वाढ होत आहे. कंपन्यांचे धोरणही विक्रीसाठी कारणीभूत ठरले आहे.
महत्त्वाच्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
फॅशन आणि लाइफस्टाइल चेन वेस्टसाइडमध्ये समान श्रेणी आणि उत्पादनांमध्ये वार्षिक स्तरावर 23 टक्के वाढ झाली आहे, परंतु कंपनीने असेही म्हटले आहे की गेल्या वर्षी तिमाहीवर कोविड-19 चा परिणाम झाला होता. एबीएफआरएलने जानेवारी-मार्च तिमाहीत निव्वळ विक्रीत 26 टक्के वाढ नोंदवली असून ती 2,880 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती आहे. मुख्य वित्तीय अधिकारी जगदीश बजाज यांनी गुंतवणूकदारांना सांगितले की, या तिमाहीत चौथ्या तिमाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्रित दोन्ही स्तरांवर कंपनीचा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल दिसून आला.
बाटा इंडियाचा महसूल वाढला
पादत्राणे किरकोळ विक्रेते बाटा इंडियानेही चौथ्या तिमाहीत आपल्या महसुलात 17 टक्क्यांनी दुहेरी आकडी वाढ नोंदवली असून ती 779 कोटी रुपयांची झाली आहे. मोतीलाल ओसवाल यांनी, वाढीव प्रवेशासह किंमती वाढल्या असल्याचेही नमूद केले आहे.