रायपूरमधील नव्या स्टेडियमवर रंगणार लढत
वृत्तसंस्था/ रायपूर
भारत व न्यूझीलंड यांच्यात येथील नव्या स्टेडियमवर दुसरा वनडे सामना आज शनिवारी होत असून पहिला सामना जिंकल्यानंतर मालिकाविजय याच सामन्यात निश्चित करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. मात्र यासाठी त्यांना मध्यफळीकडून अधिक धावांची आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांकनडून शिस्तबद्ध मारा होण्याची गरज आहे. दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
रायपूरमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात येत असून 60,000 हून प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. भारतातील हे 50 वे केंद्र बनले आहे. 350 धावांचा पाठलाग करताना पहिल्या सामन्यात 6 बाद 131 अशी न्यूझीलंडची अवस्था करीत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण मिळविले होते. पण यानंतर गोलंदाजांनी त्यांना तब्बल 206 करू दिल्याने न्यूझीलंडने जवळपास विजय मिळविलाच होता. भारतासाठी ही बाब चिंताजनक आहे. पिछाडीवर पडूनही विजय खेचून आणण्याच्या स्थितीत न्यूझीलंड पोहोचले होते. पण सिराजने अप्रतिम कामगिरी करीत न्यूझीलंडला विजयापासून वंचित ठेवत भारताला त्यात विजय मिळवून दिला होता.
गिलला इतरांची साथ अपेक्षित
फलंदाजीत शुबमन गिलने द्विशतकी खेळी करीत भारताला साडेतीनशेच्या जवळपास मजल मारून दिली. इतरांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्याआधी लंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कोहलीने चमकदार प्रदर्शन करीत भारताला विजय मिळवून दिला होता. हार्दिक पंडय़ाकडून अलीकडे फलंदाजीत अपेक्षापूर्ती झालेली नाही. यावेळी त्याच्याकडून मोठय़ा व आक्रमक खेळीची अपेक्षा आहे. बांगलादेशविरुद्ध वेगवान द्विशतक फटकावल्यामुळे इशान किशनला मध्यफळीत सामील करून घेण्यात आले. मात्र तो अपयशी ठरला. त्याची भरपाई करण्यासाठी तो या सामन्यात प्रयत्न करेल. सलामीवीर व कर्णधार रोहित शर्मा चांगल्या टचमध्ये आहे. पण त्याला चांगली सुरुवात करूनही मोठय़ा खेळी करता आलेल्या नाहीत. नव्या मैदानावर तो ‘प्रसन्न’ होतो का, हे पहावे लागेल.
गोलंदाजीत चिंता
मात्र भारताला खरी चिंता आहे ती गोलंदाजीच्या विभागात. पहिल्या सामन्यात सिराजचा अपवाद वगळता मायकेल ब्रेसवेलने सर्वच गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. फलंदाजीची क्षमता विचारात घेऊन शार्दुल ठाकुरला उमरान मलिकच्या जागी खेळविण्यात आले. पण त्याच्याकडून अपेक्षापूर्ती झाली नाही. त्यामुळे फलंदाजी करणारा गोलंदाज हवा, की वेगवान मारा करणारा स्पेशालिस्ट गोलंदाज हवा, याचा निर्णय व्यवस्थापनाला त्वरित घ्यावा लागेल. सिराज हा सर्व टप्प्यातील गोलंदाज म्हणून विकसित झाला आहे, मात्र इतरांना आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. शमीने नव्या चेंडूवर उत्कृष्ट मारा केला. पण ब्रेसवेलने नंतर त्यालाही झोडपून काढले तर हार्दिकही बराच महागडा ठरला होता.
फिरकी विभागात वाशिंग्टन सुंदरला भरपूर मार पडला तर कुलदीपने पुन्हा एकदा प्रभावी मारा करीत दोन बळी टिपले. चहल व कुलदीप यांना एकत्र खेळविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र एक मनगटी व एक फिंगर स्पिनर खेळविण्याच्या धोरणामुळे या पर्यायाचा व्यवस्थापन वापर करणार नाही, असे वाटते.
न्यूझीलंडचे मनोबल उंचावलेले
परिस्थीत कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही व प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत, हा गुण न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात दाखवून दिला. या कामगिरीने प्रेरित होऊन ते या सामन्यात जादा आत्मविश्वासाने खेळू शकतील. सातव्या व आठव्या क्रमांकावरील फलंदाज ब्रेसवेल व सँटनर यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले, पण असे वारंवार घडू शकत नाही. फिन ऍलेनने काही धाडसी फटके मारले. पण तो मोठी खेळी करू शकला नाही आणि विल्यम्सनच्या गैरहजेरीत न्यूझीलंडच्या डावाला कोणीतरी अँकरिंग करण्याची गरज आहे. हेन्री शिपले, फर्ग्युसन, टिकनर यांना गिलने भरपूर चोप दिला होता. त्यांना अधिक अचूकता आणावी लागेल. ईश सोधी या सामन्यासाठी फिट होतो का, हे पहावे लागले. न्यूझीलंडला हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), इशान किशन, कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत, सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, चहल, कुलदीप यादव, शमी, सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंड ः टॉम लॅथम (कर्णधार), ऍलेन, डग ब्रेसवेल, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, देव्हॉन कॉनवे, जेकब डफी, फर्ग्युसन, डॅरील मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, सँटनर, शिपले, ईश सोधी, टिकनर.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 वाजता
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेवटर्क.