पराराष्ट्र मंत्रालयात यादी एकमेकांना सुपूर्द
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानने रविवारी एकमेकांना त्यांच्या अण्वस्त्र स्थळांची यादी सुपूर्द केली. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून अशापद्धतीने आण्विक केंद्राच्या यादीची देवाण-घेवाण करत आहेत. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारांतर्गत दोघांना ही यादी द्यावी लागते. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास या आण्विक तळांवर हल्ला करता येणार नाही.
भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या आण्विक तळांवर आणि सुविधांवर हल्ला न करण्याचा करार केला आहे. या अंतर्गत माहितीची देवाण-घेवाण होते. 31 डिसेंबर 1988 रोजी स्वाक्षरी केलेल्या आणि 27 जानेवारी 1991 रोजी अंमलात आणलेल्या करारामध्ये प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी रोजी आण्विक तळांची माहिती दिली जाते. उभय देशांमधील अशा यादींची ही सलग 32वी देवाण-घेवाण आहे. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना ही प्रक्रिया करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत पाकिस्तानमधील अण्वस्त्र स्थळांची आणि उपकरणांची यादी रविवारी इस्लामाबादमधील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला अधिकृतपणे सुपूर्द केली. त्याचबरोबर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या आण्विक तळांची आणि सुविधांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला सुपूर्द केली.
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली होती. हा निर्णय आपला अंतर्गत मामला असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानला स्वतःच्या क्षेत्रात लक्ष घालण्याचा सल्ला दिला होता.