छायाचित्रण स्पर्धेत ठरले ‘पिक्चर ऑफ द ईयर’
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेत भारतीय वंशाचे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि छंद म्हणून छायाचित्रकार झालेले कार्तिक सुब्रमण्यम यांनी नॅशनल जियोग्राफिकची पहिली ‘पिक्चर ऑफ द ईयर’ ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली आहे. कार्तिक यांच्या छायाचित्राचे नाव ‘डान्स ऑफ ईगल्स’ आहे. सुमारे 5 हजार छायाचित्रांमधून त्यांच्या छायाचित्राची निवड करण्यात आली आहे. नॅशनल जियोग्राफिक नियतकालिकात प्रतिष्ठित छायाचित्रकारांसोबत त्यांना स्थान देण्यात आले आहे.
अलास्काच्या चिलकट बाल्ड ईगल प्रिझर्व्हमध्ये एका झाडाच्या फांदीवर जागेसाठी बाल्ड ईगल्समधील लढाई दर्शविणारे हे छायाचित्र आहे. चिलकल बाल्ड ईगल प्रिझर्व्हमध्ये सॅल्मन माशांची शिकार करताना एक ईगल स्वतःच्या सहकाऱयांना धमकाविताना यात दिसून येतो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सॅल्मन माशांची शिकार करण्यासाठी शेकडो गरुड अलास्काच्या हॅन्सनजीक चिलकट बाल्ड ईगल प्रिझर्व्हमध्ये एकत्र येत असतात असे सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.
गरुडांच्या वर्तनाच्या पॅटर्नचे अध्ययन केल्यावर मला त्यांच्या काही कार्यांचा अनुमान लावण्यास मदत झाली. एक गरुड जेव्हा शिकारीनंतर मासा कोरडय़ा ठिकाणी नेतो, तेव्हा क्षेत्रातील अन्य गरुड अनिवार्य स्वरुपात स्वतःच्या हिस्स्यावर दावा करण्यासाठी तेथे जातात आणि यामुळे त्यांच्यात लढाई सुरू होत असल्याचे कार्तिक यांनी सांगितले आहे.
कॅलिफोर्नियात नोकरी करत असलेले सॉफ्टवेअर इंजिनियर सुब्रमण्यम यांनी 2020 नंतर वन्यजीव छायाचित्रणाचा अनुभव घेण्यास सुरुवात केली होती. त्यापूर्वी ते केवळ नैसर्गिक दृश्यांना स्वतःच्या कॅमेऱयात कैद करायचे. सुब्रमण्यम यांचे छायाचित्र नॅशनल जियोग्राफिक नियतकालिकाच्या मे महिन्यातील अंकात प्रकाशित होणार आहे.