कोरोना संकटानंतर वृद्धांना लिहिली 15 लाख पत्रं
भारतीय वंशाच्या अमेरिकेतील दोन बहिणी जगभरातील वृद्धांना पत्र लिहून त्यांचा एकाकीपणा दूर करत आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी 15 लाख पत्रं लिहिली आहेत. मॅसाचुसेट्स येथील श्रेया पटेल आणि तिची लहान बहिण सेफ्रॉन 2022 च्या प्रारंभी कोरोना संकटामुळे स्वतःच्या आजी-आजोबांसोबत राहू शकली नाही. अशा स्थितीत त्यांना आनंदी करण्यासाठी या बहिणींनी व्हिडिओ कॉलची मदत घेतली, परंतु यातही काही तरी कमी भासत असल्याचे श्रेयाला वाटत होते.
अगेन्स्ट आयसोलेशन संस्था
आम्ही आजी-आजोबांना दरदिनी फोन आणि मेसेज करत होतो. तरीही त्यांना एकाकी वाटायचे, एक दिवस माझ्या आजीच्या एका मैत्रिणीने त्यांना पत्र लिहिले. याच पत्रामुळे अगेन्स्ट आयसोलेशन संस्थेची सुरुवात झाल्याचे श्रेया सांगते. या संस्थेने 7 देशांमध्ये 5 लाखाहून अधिक लोकांना पत्र लिहिण्यासाठी प्रेरित केले. मागील दोन वर्षांमध्ये त्यांच्या संस्थेने 15 लाख पत्रं पाठविली आहेत. या कामासाठी त्यांना 2022 चा प्रतिष्ठित डायना पुरस्कारही मिळाला आहे.
आठवडय़ाभरात 22 वृद्धांना लिहिले पत्र
पत्रांमुळे आम्ही एकाकीपणाला सामोरे जाणाऱया वृद्धांमध्ये सकारात्मकता आणू शकतो असे आम्हाला वाटले. वृद्धाश्रम आणि केयर होममध्ये राहणाऱया वृद्धांना पत्र, कलाकृती आणि सकारात्मक संदेश पाठविण्यास सुरुवात केली. लवकरच आम्ही वृद्धांमध्ये लोकप्रिय ठरलो. आठवडाभरात आम्ही 200 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना पत्रं लिहिली होती. तेव्हा आम्हाला मदतीची गरज जाणवू लागली होती. तर ज्या लोकांना ही पत्रं मिळाली, त्यांचे जीवनच बदलले. हे वृद्ध मिळणारी पत्रं सांभाळून ठेवण्यासह इतरांना दाखवत असल्याचे आम्हाला कळले. ही पत्रं वाचून त्यांना प्रेरणा मिळत असल्याचे श्रेयाने म्हटले आहे. दोन्ही बहिणींचे ही अभियान यशस्वी ठरले. दोन महिन्यांमध्ये अमेरिकेच्या 11 प्रातांमध्ये ही पत्रं नवी आशा निर्माण करू लागली होती. पत्रांची वाढती मागणी पाहता एप्रिल 2020 मध्ये त्यांनी लेटर अगेन्स्ट आयसोलेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
जगभरात 40 हजार स्वयंसेवक
या संस्थेद्वारे आता जगभरात 40 हजाराहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्यांच्याच माध्यमातून एकटे राहणाऱया वृद्धांची माहिती मिळते. अमेरिकेसह ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमध्ये 10 लाखाहून अधिक तर अन्य देशांमध्ये 5 लाख वृद्ध पत्र प्राप्त केल्यावर सकारात्मक झाले आहेत. कोरोना महामारी दूर झाली असली तरीही एकाकीपणाचा मुद्दा कायम आहे. ही समस्या आमच्या समाजात होती आणि यापुढेही राहणार असल्याचे श्रेया सांगते.
जगभरात लोकप्रिय
या पुढाकारानंतर श्रेया आणि सेफ्रॉन जगभरात चर्चेत आल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या उद्घाटन समितीच्या कार्यक्रमात त्यांना भाग घेतला आहे. तसेच हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना आमंत्रित केले आहे. ही संस्था आता वेगाने विस्तारत असून अलिकडेच एक स्टॅम्प फंड लाँच करण्यात आला असून याद्वारे स्वयंसेवकांना पैशांची कमतरता भासू नये आणि त्यांनी वृद्धांना सातत्याने पत्रं लिहावीत अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
श्रेयाला डायना पुरस्कार
या अनोख्या अभियानाला द न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या जागतिक प्रसारमाध्यमांनी गौरविले आहे. तर दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांना निधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. समाजासाठी या अभूतपूर्व योगदानामुळे श्रेया पटेल हिला डायना पुरस्कार देण्यात आला आहे. युवराज्ञी डायना यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा पुरस्कार समाजासाठी काहीतरी चांगले करणाऱया मुलामुलींना दिला जातो.