सेन्सेक्स 114 अंकांनी वधारला ः बजाज फिनसर्व्ह मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी तेजी राहिली होती. दोन्ही निर्देशांक वधारासह बंद झाले.
विदेशी गुंतवणूकादारांचा कल सकारात्मक राहण्यासोबत जागतिक बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिले होते. याचा लाभ शुक्रवारच्या सत्रात भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा तेजी नोंदवत दोन मुख्य निर्देशांक बंद झाले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा 20 समभागांचा बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 113.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,950.36 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18,117.15 अंकांवर पोहोचला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स आणि विप्रो यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाल्याचे पाहायल मिळाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये डॉ.रेड्डीज लॅब, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसीचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांवर नजर टाकल्यास आशियाई बाजार तेजीत होते तर सोबत युरोपातही हीच स्थिती होती. आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग वाढीसह बंद झाले. तर जपानचा निक्की हा घसरणीसह बंद झाला आहे. युरोपमधील बजारात दुपारपर्यंत सकारात्मक सत्र राहिले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.34 टक्क्यांनी वधारुन 96.89 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. चालू आठवडय़ातील समाप्तीनंतर आता जागतिक पातळीवर नव्याने होणाऱया घडामोडींच्या आधारे आगामी काळातील बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे संकेत शेअर बाजारातील अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱया दिवसांमध्ये बाजार कोणती दिशा घेणार हे पहावे लागणार आहे.