सुकेश चंद्रशेखरने केले होते गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तिहार तुरुंगात कैद असणाऱया सुकेश चंद्रशेखरकडून तुरुंगात संरक्षण पुरविण्याच्या बदल्यात 10 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांच्यावर झाला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर गोयल यांची बदली करण्यात आली आहे. 1989 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेल्या गोयल यांना पुढील आदेशांसाठी पोलीस मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गोयल यांच्या जागी आता 1989 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी संजय बेनीवाल यांना नवे तुरुंग महासंचालक करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांनी तुरुंगात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 2019 मध्ये आपल्याकडून 10 कोटी रुपयांची खंडणी उकळली होती असा आरोप सुकेशने दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहून केला होता.