दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवी व शेवटची निर्णायक टी-20 आज
बेंगळूर / वृत्तसंस्था
पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध आज (रविवार दि. 19) होणाऱया पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यात ‘परफेक्ट क्लायमॅक्स’साठी भारतीय संघ विशेष महत्त्वाकांक्षी असणार आहे. सलग 2 जिगरबाज विजयांसह बरोबरी साधल्यानंतर आता हॅट्ट्रिक विजयासह मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचा पंतसेनेचा निर्धार असेल. ही लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार आहे.
मागील अवघ्या 8 दिवसांच्या कालावधीत 4 सामने खेळणाऱया भारतीय संघाने पहिले दोन सामने गमवावे लागल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. त्यांनी तिसरा सामना 47 धावांनी तर चौथा सामना 82 धावांनी जिंकला. दिनेश कार्तिकने चौफेर फटकेबाजी करत मागील सामन्याचा नूर पालटला तर हर्षल पटेल, अवेश खान यांनी आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली.
आयपीएल स्पर्धेनंतर लगोलग या टी-20 मालिकेत उतरणाऱया भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात लागोपाठ पराभव पचवावे लागले, त्यावेळी खेळाडू थकले असल्याचा तो स्पष्ट दाखला होता. पण, नंतर यातून वेळीच सावरत भारतीय खेळाडूंनी सलग दोन सामने जिंकत बरोबरी प्राप्त केली. आज होणाऱया पाचव्या व शेवटच्या लढतीत आणखी एक दमदार विजय मिळवत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
बवूमाच्या उपलब्धतेबाबत साशंकता
आजच्या निर्णायक लढतीसाठी तेम्बा बवूमा वेळेत तंदुरुस्त होऊ शकला नाही तर दक्षिण आफ्रिकेला एक फलंदाज या नात्यापेक्षाही कर्णधार या नात्याने त्याची उणीव अधिक प्रकर्षाने जाणवेल. या मालिकेत ना पंतचे नेतृत्व प्रभाव टाकू शकले आहे, ना तो स्वतः फलंदाजीत आपली कामगिरी उंचावू शकला. पण, तरीही भारताने केवळ सुदैवानेच मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे, आजची लढत विशेष महत्त्वाची असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
द. आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पर्नेल, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, मार्को जान्सन.
सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.
आघाडीवीर त्रिकुटाकडून अद्याप अपेक्षापूर्ती नाहीच!
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टॉप थ्रीमध्ये इशान किशन, ऋतुराज गायकवाड व श्रेयस अय्यर यांच्यावर पूर्ण भिस्त ठेवली. पण, हे तिघे अद्याप विश्वासाला खरे ठरु शकलेले नाहीत. ऋतुराज गायकवाड दुसऱया फळीतील गोलंदाजांचा उत्तम समाचार घेण्यात मातब्बर आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल गोलंदाजांना सामोरे जाताना त्याला बरेच झगडावे लागते, असे सातत्याने दिसून आले. याशिवाय, इशान किशनच्या भात्यात फटक्यात वैविध्यता नाही आणि उसळत्या गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर तो कमालीचा झगडतो, हा इतिहास पाहता ऑस्टेलियात होणाऱया 2023 वर्ल्डकपमध्ये संधी मिळाल्यास त्याची कसोटी लागू शकते.
श्रेयस अय्यरला पूर्ण मालिकेत संधी मिळाली. पण, त्याने ती दोन्ही हातांनी वाया देखील घालवली आहे. भारतीय संघ यानंतर आयर्लंडविरुद्ध खेळेल, त्यावेळी त्याची जागा त्याच्यापेक्षा अधिक सरस टी-20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवने घेतली तर यात आश्चर्याचे कारण नसेल.
गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, अवेश खानवर मुख्य भिस्त
अलीकडील कालावधीत जलद-मध्यमगती गोलंदाजीच्या आघाडीवर, भुवनेश्वरने स्विंग गोलंदाजीत अधिक यश मिळवले असून अवेश खानने नियंत्रित टप्प्यावर भेदक बाऊन्सवर टाकण्यात उत्तम सातत्य राखले आहे. फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल अपेक्षित यशापासून दूर राहिला. त्या तुलनेत चहलने लक्षवेधी सुधारणा केली आहे.
दिनेश कार्तिकने धोनीचा विक्रम मागे टाकला
यापूर्वी चौथ्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिक टी-20 अर्धशतक साजरे करणारा भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम येथे मागे टाकला. राजकोटमधील त्या लढतीत कार्तिकने 27 चेंडूत 55 धावांची आतषबाजी केली. शिवाय, हार्दिक पंडय़ासह अवघ्या 33 चेंडूत 65 धावांची जलद भागीदारी नोंदवली.
37 वर्षे, 16 दिवस असताना अर्धशतक नोंदवणारा दिनेश कार्तिक आता टी-20 मधील भारताचा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला. त्यापूर्वी धोनीने 36 वर्षे 229 दिवसांचा असताना 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 धावांची खेळी साकारली होती.
…तर वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिक प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक!
आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर मागील बरेच सामने गाजवत आलेला दिनेश कार्तिक सध्या पूर्ण बहरात असून आगामी कालावधीत आयसीसीचे अनेक इव्हेंट होत असताना त्यावर कार्तिकचा पूर्ण फोकस राहिला आहे.
आयर्लंडमध्ये दिनेश कार्तिक यष्टीरक्षक असेल, हे यापूर्वीच जाहीर केले गेले असून ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत आयोजित टी-20 वर्ल्डकपमध्ये तो प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून निवडला गेला तर यातही आश्चर्याचे कारण असणार नाही.