पहिले राष्ट्रकुल पदक निश्चित!
भारतीय लॉन बॉल्स संघाने महिलांच्या फोर्स इव्हेंटमध्ये न्यूझीलंडला 16-13 अशा फरकाने मात देत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. महिलांच्या फोर्स फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने निर्णायक लढतीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघात लवली चौबे (लीड), पिंकी (सेकंड), नयनमोनी साईकिया (थर्ड) आणि रुपा रानी तिर्की (स्कीप) यांचा समावेश असून आता सुवर्णपदकासाठी आज (मंगळवार दि. 2) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचा मुकाबला होणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघाची आज इंग्लंडविरुद्ध कसोटी
येथील बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेच्या रणांगणात भारतीय महिला हॉकी संघ आज (मंगळवार दि. 2) इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी या स्पर्धेतील त्यांची पहिली खरी कसोटी लागेल. भारतीय संघाने यापूर्वी घानाविरुद्ध 5-0 व वेल्सविरुद्ध 3-1 अशा फरकाने अ गटातील पहिल्या दोन सामन्यात शानदार विजय संपादन केले असले तरी तेथे त्यांचा फारसा कस लागला नव्हता. मात्र, आज बलाढय़ इंग्लंडचा संघ भारतासाठी कडवे आव्हान उभे करु शकतो. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इंग्लिश संघाकडूनच भारताला कांस्यपदकाच्या लढतीत 3-4 फरकाने पराभवाचा धक्का सोसावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारतीय महिला हॉकी संघाचा प्रयत्न असेल.