किंमत 60 हजारापर्यंत शक्य ः विविध वैशिष्टय़ांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाईल क्षेत्रात नाव कमावणारी वन प्लस कंपनीचा नवा वनप्लस 10 टी 5जी स्मार्टफोन लवकरच खरेदीदारांना खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. वन प्लसने तीन वर्षाच्या कालावधीनंतर आपला नवा मोबाईल लॉँच करण्याचे निश्चित केले आहे. वन प्लस जागतिक स्तरावर वनप्लस 10 टीचे लाँचिंग येत्या 3 ऑगस्टला करणार असल्याचे सांगितले आहे.
या फोनचे जागतिक स्तरावर लाँचिंग न्यूयॉर्क शहरांमधील गोथम हॉलमध्ये पहिल्यांदाच आयोजन केले जाणार असल्याची माहिती वन प्लसकडून मिळाली आहे. याचाच एक भाग म्हणून वन प्लसचे 10 टी 5 जी फोनचे लाँचिंग भारतामध्ये बेंगळूरुमधील बंगळूर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामध्ये 3 ऑगस्टला होणार आहे. या लाँचिंग कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे वापरकर्त्यांना स्मार्टफोनची ऑर्डरची नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे वापरकर्ते व चाहत्यांना कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार असून त्या ठिकाणी कंपनीकडून संबंधितांना गिफ्ट हॅम्परही दिले जाणार असल्याची माहिती आहे. सदरचा कार्यक्रम अविस्मरणीय करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार असल्याचे सांगितले जात आहे.