वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे 11 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या नेशन्स चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने बुधवारी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली. या स्पर्धेसाठी 20 जणांचा संघ निवडण्यात आला असून गोलरक्षक सविताकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. अनुभवी राणीला दुखापत झाल्याने ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
या स्पर्धेसाठी दीप ग्रेस एक्काकडे उपर्णधारपद सोपविण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राणीची कामगिरी दर्जेदार झाली होती पण तंदुरुस्तीच्या समस्येमुळे तिला स्पेनमधील ही स्पर्धा हुकत आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या वर्षभरातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यादीत नेशन्स चषक ही महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 2023-24 च्या महिलांच्या प्रो लिग हंगामात बढती दिली जाते.
स्पेनमध्ये होणाऱया स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश असून या गटामध्ये चिली, जपान आणि दक्षिण आफ्रिका तर अ गटामध्ये आयर्लंड, इटली, कोरिया, यजमान स्पेन यांचा सहभाग आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा सामना चिलीबरोबर होत आहे.
भारतीय महिला हॉकी संघ-गोलरक्षक-सविता (कर्णधार), के. बिचु देवी, बचावफळी- दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मध्यफळी- निशा, सलिमा टेटे, सुशिला चानू, मोनिका, नेहा सोनिका, ज्योती नवज्योत कौर, आघाडीफळी- वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, संगीता कुमारी आणि ब्युटी डुंगडुंग.