वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया (स्पेन)
आंतरराष्ट्रीय हॉक फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या 2022 च्या नेशन्स चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य सामन्यात आयर्लंडचा पेनल्टी शूटाऊटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
या चुरशीच्या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 14 व्या मिनिटाला आयर्लंडचे खाते कॉरोल नाओमीने उघडले. 44 व्या मिनिटाला उदिताने भारताला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटाऊटचा अवलंब केला आणि भारताने आयर्लंडचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघाला 2023-24 च्या हॉकी हंगामात होणाऱया आंतररष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी बढती मिळण्याची संधी जीवंत राहिली आहे.
या उपांत्य सामन्यापूर्वी या दोन संघांमध्ये आतापर्यंत 7 सामने झाले असून भारताने 4 तर आयर्लंडने 3 सामने जिंकले होते. आता या स्पर्धेत भारताचा स्पेन बरोबर अंतिम सामना होईल. यजमान स्पेनने दुसऱया उपांत्य सामन्यात जपानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.