वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने रविवारी येथून जपानला प्रयाण केले. जपानमध्ये 2 जूनपासून सुरु होणाऱ्या 2023 च्या आशिया चषक कनिष्ठांच्या महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होत आहे. आंतरराष्ट्रीय हॉक फेडरेशनच्या आगामी कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी ही पात्र फेरीची स्पर्धा आहे.
कनिष्ठ महिलांची आशिया चषक हॉकी स्पर्धा 2 जूनपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा अ गटात समावेश आहे. या गटामध्ये कोरीया, मलेशिया, चीन तैपेई आणि उझबेकिस्तान तसेच ब गटात यजमान जपान, चीन, कझाकिस्तान, हाँगकाँग, इंडोनेशिया यांचा समावेश आहे. कनिष्ठ महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले तीन संघ 2023 च्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरतील. जपानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 3 जूनला उझबेकिस्तान बरोबर होत आहे. त्यानंतर भारताचे पुढील सामने 5 जूनला मलेशिया बरोबर, 6 जूनला कोरीया बरोबर, 7 जूनला चीन तैपेई बरोबर होत आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामने 10 जूनला तर अंतिम सामना 11 जूनला खेळविला जाईल. या स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे नेतृत्व प्रितीकडे सोपविण्यात आले असून दीपिका उपकर्णधार म्हणून राहिल.