पक्षश्रेष्ठी करणार मध्यस्थी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढतच चालला आहे. परंतु मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे मातब्बर नेते सचिन पायलट यांच्यातील राजकीय संघर्षाला विराम मिळणार असल्याचे आता मानले जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी चालू आठवड्यात दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांदरम्यान तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न असणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे चालू वर्षाच्या अखेरीस राजस्थानात होणारी विधानसभा निवडणूक पाहता सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्ष दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. खर्गे हे लवकरच पायलट यांची भेट घेणार आहेत. तसेच राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कलहाबद्दल जाणून घेण्यासाठी पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखविंर सिंह रंधावा, तिन्ही सह-प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्याशीही खर्गे चर्चा करणार आहेत.
संबंधित बैठकीत काँग्रेस प्रदेश प्रभारी रंधावा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, सचिन पायलट आणि तिन्ही सह-प्रभारी सहभागी होतील. तसेच बैठकीत प्रतापसिंह खाचरियावास, हरीश चौधरी, रघु शर्मा आणि रघुवीर मीणा यासारख्या नेत्यांना सामील केले जाऊ शकते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायलट यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते असे मानले जात आहे. तसेच पायलट यांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीत मुक्त हस्त दिला जाऊ शकतो. तसेच काँग्रेसने राज्यात सत्ता राखल्यास दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा प्रस्ताव आहे, यातील एक उपमुख्यमंत्रिपद सचिन पायलट यांना तर दुसरे उपमुख्यमंत्रिपद गेहलोत गटातील नेत्याला दिले जाणार आहे. पक्षाच्या या प्रस्तावामुळे गेहलोत यांची चिंता वाढल्याचे मानले जात आहे.