वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रितीच्या नेतृत्वाखाली भारतीय कनिष्ठ महिला संघाने मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी बेंगळूर येथून प्रयाण केले. या दौऱ्यात भारतीय महिला कनिष्ठ हॉकी संघ यजमान दक्षिण आफ्रिकेच्या कनिष्ठ महिला हॉकी संघासमवेत तसेच दक्षिण आफ्रिका अ संघाबरोबर 17 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हॉकी सामने खेळणार आहे. आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी महिला संघाला अधिक सराव व्हावा या दृष्टीकोनातून दक्षिण आफ्रिकेचा दौरा आयोजित केला आहे. 21 वर्षाखालील वयोगटासाठी होणाऱ्या आशिया चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेपूर्वी भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाला सरावाची संधी दक्षिण आफ्रिकेत उपलब्ध झाली आहे. कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी आशिया चषक 21 वर्षाखालील वयोगटासाठी स्पर्धा पात्रतेची म्हणून ओळखली जाणार आहे. भारतीय महिला हॉकी संघामध्ये आघाडीफळीमध्ये कर्णधार प्रिती, दीपिका सोरेंग, दीपिका, सुनेलिता टोपो, मधू गुला, भवानी, अनू आणि तरणप्रित कौर यांचा समावेश असून मध्यफळीत ज्योती छेत्री, मंजू चोरसिया, हिना बानू, निकिता टोपो, ऋतिका सिंग, साक्षी राणा, ऋतुजा पिसाळ, यांचा समावेश असून बचावफळीत प्रिती, ज्योती सिंग, निलम, माहिमा टेटे, ममिता ओरम यांचा सहभाग राहिल. 17, 18 आणि 20 फेब्रुवारीला भारतीय कनिष्ठ महिला संघाचे सामने दक्षिण आफ्रिकेच्या 21 वर्षाखालील वयोगटाच्या संघाबरोबर होणार आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघाबरोबर त्यांचे दोन सामने 24 आणि 25 फेब्रुवारीला खेळवले जातील.