लान्सेट’ या जगद्विख्यात नियतकालिकाचा निर्वाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताची स्वदेशी कोव्हॅक्सिन ही कोरोनाविरोधी लस 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे, असा निर्वाळा लान्सेट या जागतिक लोकप्रियता लाभलेल्या वैद्यकीय नियतकालिकाने दिला आहे. या लसीमुळे मुलांमध्ये कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती मोठय़ा प्रमाणात तयार होते. प्रौढ व्यक्तींपेक्षाही मुलांमध्ये या लसीमुळे अधिक प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट होत असल्याचे या नियतकालिकाच्या ताज्या अंकात स्पष्ट करण्यात आले.
या लसीच्या सुरक्षिततेची पडताळणी करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीने मोठय़ा प्रमाणात चाचण्या घेतल्या होत्या. दुसऱया आणि तिसऱया टप्प्यात ओपन लेबल पद्धतीने अनेक स्थानी बहुकेंद्री परिक्षणे करण्यात आली होती. या लसीमुळे शरिरावर होणारी प्रतिक्रिया आणि लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती या दोन्ही बाबी अनेक चाचण्या घेऊन तपासण्यात आल्या होत्या. आता लान्सेट सारख्या विश्वासार्ह नियतकालिकाने या लसीचे कौतुक केल्याने आमची सर्व प्रतिपादने सिद्ध होत आहेत, असे उद्गार भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी शुक्रवारी काढले.
ध्येयाची पूर्ती
मुले आणि प्रौढ व्यक्ती यांच्यासाठी कोरोना विरोधातील एक प्रभावी आणि सुरक्षित लस निर्माण करण्याचे ध्येय ठेवून सार्वजनिक क्षेत्रातील भारत बायोटेक या कंपनीने अडीच वर्षांपूर्वी लसविकास उपक्रम हाती घेतला होता. या ध्येयाची पूर्ती आता झाली आहे. आम्ही भारतीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण स्वदेशी आणि परिणामकारक लस शोधून काढण्यात यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. ही लस बूस्टर डोस म्हणूनही अत्यंत प्रभावी आहे.
दुष्परिणाम जवळजवळ नाहीत
लसीच्या चाचण्यांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. 374 प्रकरणांमध्ये लसीमुळे त्रास झाल्याचे दिसून आले. तथापि, यांपैकी बरीच प्रकरणे अत्यंत सौम्य होती. कोटय़वधी लोकांना ही लस टोचण्यात आली. त्यांच्यातही कोणतीही विपरीत प्रतिक्रिया निर्माण झाल्याचे दिसून आले नाही.
सध्या भारत बायोटेकजवळ 5 कोटी लसींचा साठा आहे. तो आवश्यकतेनुसार केव्हाही पुरविला जाऊ शकतो. प्रतिवर्ष 100 कोटी लसी निर्माण करता येतील इतकी उत्पादन क्षमता विकसीत करण्यात आली आहे. त्यामुळे या लसीची निर्यात आणि देशांतर्गत विक्री करण्यात समस्या नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.