लोकसभेपूर्वी विधानसभा निवडणुकीवर नजर : आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीची पहिली संयुक्त प्रचारसभा मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीची लोकसभेपूर्वी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आयोजित झाली. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे. या बैठकीत शरद पवार, के. सी. वेणुगोपाल (काँग्रेस), टी. आर. बालू (द्रमुक), तेजस्वी यादव (राजद), संजय राऊत (शिवसेना युबीटी), संजय झा (संजद), हेमंत सोरेन (झामुमो), राघव चड्ढा (आप), डी. राजा (भाकप), ओमर अब्दुल्ला (एनसी), मेहबुबा मुफ्ती (पीडीपी) आणि जावेद अली (सप) यांनी भाग घेतला आहे.
तृणमूलकडून सहभाग नाही
इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष सामील आहे. तृणमूलच्या वतीने ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना समन्वय समितीचे सदस्य करण्यात आले आहे, परंतु ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागल्याने अभिषेक बॅनर्जी हे या बैठकीत सामील झालेले नाहीत. बैठकीत 12 पक्षांचे प्रतिनिधी सामील झाले होते.
जागावाटपावर लवकरच निर्णय
समितीने जागावाटपावरुन चर्चा सुरू केली आहे. आघाडीचे सदस्य पक्ष यावर चर्चा करून लवकरच निर्णय घेतील असे बैठकीनंतर आघाडीकडून सांगण्यात आले. विरोधी पक्षांची ही आघाडी संयुक्त स्वरुपात देशाच्या विविध भागांमध्ये प्रचारसभा घेणार आहे. अशाप्रकारची पहिली सभा भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. या सभांच्या माध्यमातून वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावरून भाजप सरकारला घेरण्यात येईल असे ‘इंडिया’कडून जारी वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे. आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जातीय जनगणनेचे समर्थन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.