‘जी-20’च्या यशामुळे कार्यकर्त्यांकडून फुलांच्या वर्षावात स्वागत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, 13 सप्टेंबर रोजी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. तेथे त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांना पाहताच कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी सुरू करत त्यांच्यावर पुष्पवृष्टीही केली. त्यांच्या स्वागतासाठी भाजप मुख्यालयात सायंकाळपासून बराचवेळ कार्यकर्ते प्रतीक्षा करत होते.
जी-20 च्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे त्यांनी हस्तांदोलन करून कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यादरम्यान पंतप्रधानांनी बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यालयात झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, सदर चर्चेबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.