वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारात भारतीय महिला स्केटर्सनी आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. महिलांच्या आर्टिस्टीक सिंगल फ्री स्केटिंग शॉर्ट प्रोग्रॅममध्ये भारताच्या ग्रीष्मा दोनतारा आणि साई समिता अकुला यांनी अनुक्रमे चौथे आणि सहावे स्थान मिळवले आहे.
ग्रीष्माने चौथे स्थान मिळवताना 20.94 गुण नोंदवले असून समिताने 16.95 गुण घेतले आहेत. आता शनिवारी या प्रकारातील अंतिम फेरी होणार आहे. दरम्यान भारताच्या इतर रोलर स्केटर्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात भारतीय रोलर स्केटर्सनी दोन कास्यपदके मिळवली होती.
कॅनोईमध्ये निराशा
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कॅनोई आणि कायक या प्रकारामध्ये भारतीय स्पर्धकांकडून निराशा झाली. पुरुषांच्या कॅनोई स्लेलोम प्रकारात भारताच्या विशाल केवातला सातव्या स्थानावर तर महिलांच्या कायक अंतिम फेरीत भारताच्या शिखा चौहानला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या कॅनोईमध्ये चीनच्या झीने 98.20 गुणासह सुवर्णपदक तर उझ्बेकच्या क्लेव्हलेव्हने रौप्य आणि कझाकस्तानच्या कुलीकोव्हने कास्यपदक मिळवले. महिलांच्या कायक अंतिम फेरीत चीन तैपेईच्या चेंगने सुवर्ण, चीनच्या ली ने रौप्य तर कझाकस्तानच्या येकटेरिनाने कास्यपदक घेतले. या प्रकारात भारताने एकमेव कास्यपदक 1994 च्या हिरोशिमा क्रीडा स्पर्धेत मिळवले होते.