वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपल्या मोहिमेला विजयी सलामीने प्रारंभ केला. पहिल्या सामन्यात मनदीप सिंगच्या शानदार दोन मैदानी गोलांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात मनदीप सिंगने 51 व्या आणि 56 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. दरम्यान या सामन्यात तिसऱया पंधरा मिनिटांच्या कालावधीअखेर भारतीय संघ 2-3 असा पिछाडीवर होता. भारतातर्फे मनदीप मोरने 13 व्या मिनिटाला तर कर्णधार हरमनप्रित सिंगने 41 व्या मिनिटाला गोल केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या मानांकनात नवव्या स्थानावरील न्यूझीलंडतर्फे सॅम लेनीने 22 व्या आणि 35 व्या मिनिटाला असे दोन गोल तर जॅक स्मिथने 34 व्या मिनिटाला एक गोल केला.
या सामन्यात न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत भारतीय बचावफळी आणि गोलरक्षकावर दडपण आणले. गोलरक्षक श्रीजेशने न्यूझीलंडच्या काही चढाया थोपविल्या. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण समशेर सिंगला त्याचा फायदा उठवता आला नाही. 13 व्या मिनिटाला मनदीप मोरने उजव्या बगलेतून चेंडूवर ताबा मिळवत न्यूझीलंडचा गोलरक्षक डिक्सॉनला हुलकावणी देत भारताचे खाते मैदानी गोलवर उघडले. सामन्याच्या दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाला आघाडी वाढवण्याची संधी मिळाली होती पण न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारताची ही चढाई रोखली. 22 व्या मिनिटाला न्यूझीलंडला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि सॅम लेनीने गोल नोंदवून भारताशी बरोबरी साधली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
सामन्याच्या उत्तरार्धातील पहिल्या पाच मिनिटातच न्यूझीलंडने दोन गोल नेंदवून भारतावर आघाडी मिळवली. न्यूझीलंडच्या जॅक स्मिथने 34 व्या मिनिटाला न्यूझीलंडचा दुसरा गोल केला. त्यानंतर 35 व्या मिनिटाला सॅम लेनीने न्यूझीलंडचा तिसरा गोल केला. कर्णधार हरमनप्रित सिंगने 41 व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवरून भारताचा दुसरा गोल केला. सामन्यातील तिसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत न्यूझीलंडने 3-2 अशी आघाडी मिळवली होती. दरम्यान भारतीय संघातील सुमितला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. सुमितला 10 मिनिटे मैदानात प्रवेश देण्यात आला नाही. दरम्यान या संधीचा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पुरेपूर फायदा घेत दोन पेनल्टी कॉनर्स मिळवले पण भारतीय गोलरक्षकाच्या शानदार गोलरक्षणामुळे न्यूझीलंडला गोल करता आले नाहीत. 51 व्या मिनिटाला मनदीपने भारताचा तिसरा गोल नोंदवून न्यूझीलंडशी बरोबरी साधली. 56 व्या मिनिटाला मनदीपने स्वतःचा वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा आणि निर्णायक गोल नोंदवून न्यूझीलंडचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. या सामन्यात मोहमद रहीलने भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना स्पेनबरोबर रविवारी येथे खेळविला जाणार आहे.