लंडन, वृत्तसंस्था
बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेवर हिंदूविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप ब्रिटनमधील अनेक हिंदू संघटनांनी केला आहे. त्यामुळे आगामी कांही दिवसात लंडनमध्ये सर्व हिंदू संघटना मिळून भव्य विरोध मोर्चाचे आयोजन करणार आहेत. हा मोर्चा लंडनमधील बीबीसीच्या मुख्यालयासमोर काढण्यात येणार असून तिथे निदर्शने करण्याची योजनाही आखण्यात आली आहे. बीबीसी ही वृत्तसंस्था सातत्याने हिंदूविरोधी भूमिका घेत असून वेळोवेळी असे न करण्याची सूचना या संस्थेला करण्यात आली होती. तथापि या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. गेल्या कांही महिन्यांमध्ये बीबीसीची ही भूमिका जास्तच तीव्र झाल्याचे निदर्शनास येत आहे असा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. ब्रिटनमधील नागरिक डॉ. विवेक कौल, डॉ. स्नेह एस. कथुरिया, पंडित सतीश के शर्मा, नितीन मेहता (एमबीई) आणि दर्शनसिंग नेगी आदी मान्यवरांचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे वृत्त आहे. बीबीसीची वृत्ते हिंदू आणि हिंदू संघटनांविरोधात पक्षपातीपणा करतात. बनावट माहितीच्या आधारावर वृत्ते प्रसारित करण्यात येतात इत्यादी आरोप हिंदू संघटनांनी केले आहेत.