प्रतिनिधी /वास्को
वाडे वास्कोतील गोवा शिपयार्डसमोरील दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्तीला स्थानिक आमदार दाजी साळकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कटीयाल व विविध शासकीय अधिकाऱयांसह भेट देऊन तेथील घरांच्या सुरक्षेविषयी पाहणी केली. यावेळी स्थानिक लोकही उपस्थित होते. पावसाळय़ापूर्वी तातडीच्या उपाययोजनेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.
वास्कोतील गोवा शिपयार्डसमोरी मुंडवेल वाडे म्हणून ओळखल्या जाणाऱया भागातील काही घरांना मागच्या काही वर्षांपासून दर पावसाळय़ात दरडी कोसळण्याच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. काही वेळा तेथील घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पावसात दरडी कोसळल्याने घरात झोपलेल्या एका महिलेचा बळी गेला होता. सध्या तेथील काही कुटुंबे आपले घर सोडून इतर ठिकाणी राहात आहेत. या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न बरीच वर्षे रेंगाळलेला आहे. शासकीय अधिकाऱयांकडून काही वेळा पाहणीही झालेली आहे. मात्र, ठोस काही झालेले नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने पुन्हा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने एखादी उपयायोजना हाती घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तप्रसाद गावस, मामलेदार रघुराज फळदेसाई यांच्यासह पोलीस, अग्नीशामक दल तसेच विविध संबंधीत शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
दरडी कोसळत असलेल्या सदर ठिकाणाची पाहणी करून कशा प्रकारे कोणती उपाययोजना करता येईल याविषयी यावेळी चाचपणी करण्यात आली. आमदार दाजी साळकर म्हणाले की, हा प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडण्यात आला होता. त्यांच्याच आदेशानुसार हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. दरड कोसळण्याचा धोका रोखण्यासाठी सात कोटी खर्चाची एक योजना संबंधीत विभागाने आखलेली आहे. मात्र, ती प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार असल्याने तातडीच्या उपाययोजनेवर भर देण्यात आलेला आहे असे आमदार साळकर म्हणाले.