नियम मोडणाऱया 129 वाहनांवर कारवाई : 45 हजार 800 रु. दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबणाऱया वाहनांची शुक्रवारी जिल्हय़ात तपासणी करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हय़ातील वेगवेगळय़ा शहरात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. नियम मोडणाऱया 129 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अथणी, गोकाक, निपाणी, मुडलगीसह वेगवेगळय़ा पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात शुक्रवारी वाहनांची तपासणी करण्यात आली. खास करून शाळकरी मुलांची ने-आण करणारी वाहने तपासण्यात आली. नियम मोडणाऱया वाहनांवर कारवाई करून पोलिसांनी 45 हजार 800 रुपये दंड आकारला आहे.
शाळकरी मुलांची ने-आण करताना क्षमतेपेक्षा अधिक मुले वाहनात कोंबली जातात. यासंबंधी संपूर्ण जिल्हय़ात वाहने अडवून तपासणी करण्याची सूचना पोलीसप्रमुखांनी केली होती. शुक्रवारी दिवसभर ही मोहीम राबविण्यात आली. वाहन तपासणी मोहीम सुरूच ठेवण्यात आल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले.