अमूल्य बुंदच्या संस्थापक आरती भंडारे यांच्या विविध शाळांना भेटी
प्रतिनिधी/ बेळगाव
प्लास्टिक मुक्तीसाठी प्रथम आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. प्लास्टिकचे ग्लास, स्ट्रॉ यांना पर्याय म्हणून स्टील ग्लास व स्ट्रॉ वापरायला हवेत. विद्यार्थीदशेतच आपण या सवयी लावून घेतल्या तर आयुष्यभर आपण या नियमांचे पालन करू शकतो, असे मत अमूल्य बुंदच्या संस्थापक आरती भंडारे यांनी व्यक्त केले.
जुलै महिना हा प्लास्टिकमुक्त म्हणून आचरणात आणला जातो. या निमित्ताने आरती यांनी अनेक शाळांमध्ये जाऊन प्लास्टिकमुक्त पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वडगाव शाळा क्र. 31 मध्ये त्यांनी याबद्दल व्याख्यान दिले. त्या म्हणाल्या, प्लास्टिकचे धोके विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. किती टक्के मायक्रॉन प्लास्टिकची पिशवी असावी, मायक्रॉन म्हणजे काय? याबद्दलही त्यांनी माहिती दिली. प्राचार्य कांबळे यांनी त्यांचे स्वागत करून व्याख्यानाबद्दल धन्यवाद दिले.
या व्याख्यानाबरोबरच त्यांनी कापडी पिशव्या शिवून घेतल्या आहेत. प्रत्येक शाळेमध्ये पर्यावरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी या पिशव्या भेटीदाखल दिल्या. बेळगाव शहरातील शाळांबरोबरच खानापूर, गुंजी या ठिकाणीही त्यांनी व्याख्याने दिली आहेत.