प्रतिनिधी/ पणजी
भोम येथे रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी सरकारने भूसंपादन प्रक्रिया अखेर सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विषय बऱ्याच प्रमाणात गाजत आहे. सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा गाजत असताना या प्रकरणात अधिसूचना निघाली असल्याने भोमवासियांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. एकूण 35.314 हजार चौरस मीटर जमीन संपादन करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे येथील 64 घरे आणि 3 मंदिरे पाडावी लागणार असल्यामुळे भोमवासियांनी कडवा विरोध केला होता. या अधिसूचनेमुळे भोमवासियांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
विधानसभा अधिवेशनातही काही आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला
होता. त्या दिवशी विधानसभा संकुलात भोम येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने
गर्दी केली होती. हा मुद्दा चर्चेला आला त्यावेळी लोकांच्या हिताचे रक्षण केले जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मंदिरे वगैरे पाडली जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. मात्र अधिसूचनेनंतरही येथील लोक समाधानी नाहीत. कारण या अधिसूचनेत नेमकी किती घरे स्थलांतरित करावी लागणार याबाबत स्थानिकांत संभ्रम आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून 3-जी अंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत भोम तालुक्यातील भाग 10 / 10 मधील 0.0496 हेक्टर जमीन, भाग 10 / 11 मधील 0.0168 हेक्टर आणि भाग 10 / 3 मधील 0.0012 जमीन राष्ट्रीय महामार्ग 4 ए साठी संपादनसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वरील तिन्हीही जमिनी या कोमुनिदादच्या मालकीच्या असून त्यात इतर हक्कदारांचाही समावेश आहे. दरम्यान, या संदर्भात भोमवासीय अस्वस्थ असून अजून गोंधळाचे वातावरण आहे. या प्रश्नावर भोमवासीय आवाज उठवू शकतात, अशी परिस्थिती आहे.