अमेरिका, ब्रिटनसह सात देशांचा सहभाग : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मुख्य उपस्थिती
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे संरक्षण, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथे झालेल्या या परिषदेत अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश आणि केनिया या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेमुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरपणा आणि स्वावलंबनासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळेल, असे सांगण्यात आले.
संरक्षण भांडवल आणि महसूल खरेदीच्या निष्पक्ष, पारदर्शक आणि प्रामाणिक प्रणालीसाठी आपल्याकडे सर्वसमावेशक ब्लू बुक्स असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा संरक्षण उपकरणे आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी नियम आणि प्रक्रिया ठरविते. या परिषदेच्या माध्यमातून धोरणकर्ते, शिक्षणतज्ञ आणि सरकारी अधिकारी यांना संरक्षण वित्त आणि अर्थशास्त्रावर त्यांची मते आणि अनुभव शेअर करण्याची संधी मिळेल. यासोबतच संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरण आणि स्वावलंबनासाठी सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.
भारतीय सैन्य मजबूत
गेल्या 5 वर्षात भारतीय लष्कर खूप मजबूत झाले आहे. शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने लष्कराला संरक्षण उत्पादनांचा मोठा साठा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल आणि स्पेन या देशांकडून 1.9 लाख कोटी ऊपयांच्या लष्करी (इंडिया डिफेन्स इम्पोर्ट) वस्तू खरेदी केल्या आहेत, यावरून याचा अंदाज लावता येतो.