डॉ.जयंती नायक यांचे प्रतिपादन : ‘कोंकणी लोकगीत’ग्रंथाचे प्रकाशन
पर्वरी : एक उत्कृष्ट प्रातिनिधिक संग्रह म्हणून डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी संकलित आणि संपादित केलेला हा ‘कोंकणी लोकगीत’ ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. सुमारे पाचशेहून अधिक लोकगीते एका संग्रहात मिळतात ही मोठी देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे. आता लोकगीतात बदल होत आहेत आणि बदल हा श्रुष्टीचा नियम आहे. काळानुसार तो बदलत जाणार परंतु आपल्या कोंकणी भाषेचे वैभव, लोकगीते जपून ठेवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक डॉ. जयंती नायक यांनी केले. साहित्य अकादमीनेनिर्मित केलेल्या डॉ. पांडुरंग फळदेसाई यांच्या कोंकणी लोकगीत या ग्रंथाचे प्रकाशन समारंभात त्या प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत डॉ. पांडुरंग फळदेसाई, प्रा. कमलाकर म्हाळशी, डॉ. पूर्णानंद च्यारी, फा. केल्वीन मोंतेरो, गणेश वेळीप काणकर, आमेलिया डायस हे उपस्थित होते. यावेळी डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. कमलाकर म्हाळशी यांनी लोकगीते ग्रंथाचे समग्र विवेचन केले. प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुऊवात झाली. मान्यवरांच्या हस्ते कोंकणी लोकगीत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. फळदेसाई यांनी उपस्थितांचे स्वागत आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी कलाकारांनी विविध लोकनृत्ये, कोंकणी लोकगीते सादर केली. सूत्रसंचालन श्रेया फळदेसाई यांनी केले व शेवटी गीता फळदेसाई यांनी आभार मानले. या प्रकाशन सोहळ्याला सर्व थरातील रसिक, साहित्यिक उपस्थित होते.