चैन, छानछोकी, महागडी जीवनशैली किंवा श्रीमंती थाट याचे आकर्षण प्रत्येकालाच वाटत आलेले आहे. आपण श्रीमंत असावे आणि त्यांच्यासारखा जीवनाचा उपभोग घ्यावा, असे न वाटणारा मनुष्य केवळ विरळाच म्हटला पाहिजे. पण प्रत्येकाला वास्तवात तसे करायला मिळणे अशक्य असते. अशी भाग्यवान माणसे संख्येने कमीच असतात. त्यामुळे अनेक लोक केवळ कल्पनेत श्रीमंती उपभोगतात. तर काहीजण काहीतरी जुगाड करुन श्रीमंती जीवनशैलीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. तसे करणे कित्येकदा अंगाशी येते.
अशा प्रकारचा एक व्हिडीओ सध्या लोकप्रिय झाला आहे. एक महिला एका विमानाच्या इकॉनॉमी क्लासची तीन तिकिटे खरेदी करते. विमानात आल्यानंतर ती तीन्ही जागांवर एक गादी घालून बिझनेस क्लाससारखी जागा तयार करते आणि त्यावर झोपण्यासाठी सज्ज होते. तथापि, तसे करणे नियमांच्या विरोधात असल्याने विमानातील कर्मचारीवर्ग तिला विरोध करतो. त्यांच्यात बराच काळ तावातावाने वाद होतो. पण त्या महिलेला तसे करु दिले जात नाहीच.
त्या महिलेने असे का केले ? तर तिला इकॉनॉमी क्लासमध्ये बिझनेस क्लासचा ‘कंफर्ट’ हवा होता. पण बिझनेस क्लासचे तिकिट इकॉनॉमी क्लासपेक्षा अनेक पट महाग असते. ते तिला परवडण्यासारखे नव्हते. म्हणून ती इकॉनॉमी क्लासची तीन तिकीटे काढून त्या तीन आसनांचा उपयोग बिझनेस क्लासचे वातावरण निर्माण करण्यासाठी करते. पण हे नियमात बसत नसल्याने हा जुगाड तिच्या अंगाशी येतो. सध्या हा व्हिडीओ लोकप्रिय झाला असून उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.