वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरातील करोडो लोक वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर शनिवारी बंद झाल्यामुळे मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या हजारो वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही वापरकर्त्यांनी आपल्याला आलेल्या समस्यांबद्दल इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली. भारतीय वेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास ट्विटर ही सोशल साईट ठप्प झाली. ट्विटर वापरकर्त्यांना साईटवर लॉग इन करण्यात अडचण येत होती. तसेच कोणतेही ट्विट मिळू शकत नव्हते. तर काही वापरकर्ते आपल्या खात्यांमध्ये लॉग इन करू शकत नव्हते.
ट्विटर डाऊन होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी 6 मार्च रोजी लिंकने काम करणे बंद केल्याने ट्विटरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यादरम्यान काही वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. तर काहींसाठी इमेज लोड होत नव्हती. फेब्रुवारीमध्येही ट्विटरची सेवा काही तास बंद होती. गेल्या वषी 16 ऑक्टोबरलाही अशीच समस्या आली होती.