डॉ. सोनाली सरनोबत, शहरात विविध ठिकाणी प्रचारसभांचे आयोजन
बेळगाव : माजी मुख्यमंत्री तसेच बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर हे राज्यातील एक मातब्बर नेते आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव असल्यामुळे याचा उपयोग बेळगाव मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच होईल. जगदीश शेट्टर मोठ्या मताधिक्याने खासदार म्हणून निवडून येतील, असा विश्वास भाजपच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केला. जगदीश शेट्टर यांनी डॉ. सोनाली सरनोबत त्यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप नेते किरण जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार मनोहर कडोलकर, रोहितराव साठे, संजय भोसले, अॅड. भास्कर पाटील, सचिन बाचीकर, नम्रता हुंदरे, गीतांजली चौगुले यासह इतर उपस्थित होते.
जैन समाजबांधवांची घेतली भेट
जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी सकाळी पांगुळ गल्ली येथील जैन मंदिरानजीक जैन बांधवांची तसेच राजस्थानी समाजाची बैठक घेतली. जैन-राजस्थानी समाजाच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन शेट्टर यांनी दिले. यावेळी निराम सुंदर विजय महाराज, उत्तम सरमत जैन, विजय पोरवाल, विजय संघवी, विक्रम नाकोड, हेमराज भंडारी, बाबुलाल राजपुरोहित, विक्रम पुरोहित यासह मोठ्या संख्येने जैन व राजस्थानी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचार
भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागातून रामलिंगखिंड गल्ली, शिवाजी रोड, मुजावर गल्ली, अनसूरकर गल्ली, टिळक चौक, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, मारुती गल्ली या परिसरात जोरदार प्रचार केला. छत्रेवाडा येथे झालेल्या कॉर्नर सभेमध्ये जगदीश शेट्टर यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी संतोष पेडणेकर, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.