Jalna Maratha Andolan Kolhapur Bandh : जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून दसरा चौकात सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय आंदोलनासाठी एकत्र जमले आहेत. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेने परिसर दणाणून गेला. यावेळी हातात भगवे झेंडे घेवून निषेध नोंदवला.
आज सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज शहरात प्राथमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. एस.टी, केएमटी, रिक्षा, व्यापारी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक,बाबा पार्टे,अॅड. बाबा इंदुलकर,दिलीप देसाई,अनिल घाटगे,अॅड सतिश नलवडे, संजय पवार, रविकिरण इंगवेल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.