सिकंदर शेख – मनजीत खत्री यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : बसवण कुडची येथील शिवालय श्री माऊली क्षेमाभिवृद्धी संघ आयोजित भव्य निकाली अखिल भारतीय स्तरीय कुस्ती मैदानाचे गुरुवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कुस्ती शौकिनांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती अख्या भारतात धुमाकूळ घातलेल्या महाराष्ट्राचा महान भारत केसरी सिकंदर शेख व डबल हरियाणा केसरी मनजीत खत्री यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी भारत मदने (महाराष्ट्र) व पंजाब केसरी कमलजीत पंजाब यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व पंजाब पेसरी हॅपी पंजाब यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व हरियाणाचा साहिल यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती बेळगावचा कर्नाटक चॅम्पियन रोहित कंग्राळी व मनदीप पंजाब यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान-मोठ्या चाळीसहून अधिक कुस्त्या होणार आहेत. बसवण कुडचीत प्रथमच अखिल भारतीय स्तरीय कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य फेरीत वादग्रस्त निर्णयामुळे सिकंरद शेख याला पराभव पत्कारावा लागला. पण पराभवाला न डगमगता पुढील सर्व कुस्ती मैदाने जोमात सराव करुन सर्व कुस्त्या निकाली करण्याचे ध्येय बाळगूण कुस्ती मैदाने खेळण्यास उतरला आहे. त्यामुळे प्रमुख कुस्तीकडे सर्व कुस्ती शौकिनांची डोळे लागून राहिले आहेत. कारण मनजीत खत्रीसुद्धा तितक्याच ताकदिचा पैलवान असल्याने ही लढत अतीतटीची होणार असे कुस्ती शौकिनांचे मत आहे. त्याशिवाय इतर कुस्त्याही तितक्याच तोलामोलाच्या पैलवानांशी जोडल्यामुळे कुस्ती मैदान रंगणार आहे.