धर्मेंद्र अन् जया बच्चनच्या चित्रपटात संधी
जन्नत जुबैर सध्या खतरों के खिलाडी 12 या रियलिटी शोमुळे चर्चेत आहे. जन्नत या शोमध्ये एक मजबूत दावेदार म्हणून उदयास आली आहे. शोची विजेती ती ठरण्याची शक्यता आहे. खतरों के खिलाडी शोमध्ये जन्नत सर्वात कमी वयाची स्पर्धक आहे. 20 वर्षीय जन्नतला आणखी एक प्रोजेक्ट मिळाला आहे. तिला आता बॉलिवूडपासून ऑफर मिळाली आहे.
जन्नत जुबैर टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत प्रसिद्ध चेहरा आहे. सोशल मीडियावरही जन्नतचा मोठा चाहतावर्ग आहे. केवळ इन्स्टाग्रामवरच अभिनेत्रीला 4 कोटीहून अधिक जण फॉलो करतात. अशा स्थितीत जन्नतला धर्मा प्रॉडक्शनकडून ऑफर मिळाली आहे. जन्नतने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले असून त्यात ‘धर्मा 2.0’ असे लिहिलेले आहे. या पोस्टच्या माध्यमातून जन्नतने स्वतःच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असल्याचे मानले जात आहे.
अलिकडेच टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यची करण जौहरने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी निवड केली होती. श्रद्धा या चित्रपटात केमियो रोलमध्ये दिसून येणार आहे. अशा स्थितीत जन्नतला करण जौहरने याच चित्रपटासाठी निवडले असल्याचे मानले जात आहे. लवकरच ती आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबत मोठय़ा पडद्यावर दिसून येऊ शकते. या चित्रपटात धर्मेंद्र अन् जया बच्चन हे दिग्गज कलाकारही काम करत आहेत.