चेन्नई / वृत्तसंस्था
भारताच्या आघाडीच्या बुद्धिबळपटू कोनेरु हंपी व आर. वैशाली यांनी 44 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये बलाढय़ जॉर्जियन संघाविरुद्ध भारत अ संघाला 3-1 अशा फरकाने धडाकेबाज विजय संपादन करुन दिला. खुल्या गटात टिनेजर ग्रँडमास्टर डी. गुकेशने सलग सहावा विजय संपादन केला. मात्र, यानंतरही भारत ब संघाला माजी चॅम्पियन्स अर्मेनियाविरुद्ध 1-5-2.5 असा पराभव पत्करावा लागला.
भारत क संघाने लिथुआनियाविरुद्ध 3.5-0.5 असा विजय मिळवला. अभिजीत गुप्ता व अभिमन्यू पुराणिक यांनी प्रतिस्पर्ध्यांना मात दिली तर अनुभवी सूर्य शेखर गांगुलीने स्त्रेमाव्हिसियसविरुद्ध बरोबरी प्राप्त केली. हंपीने नॅनाला 42 चालीत मात दिली तर वैशालीने लेलाला धक्का दिला. डी. हरिका व तानिया सचदेव यांनी अनुक्रमे नितो बॅत्सिशिवली व सालोमे मेलिया यांच्याविरुद्ध बरोबरी मिळवली.
खुल्या गटात अमेरिकेने इराणला 2.5-1.5 फरकाने मात दिली. फॅबिआनो कारुआनाने पॅरहमला पराभूत केले. अन्य तीन पटावरील डाव बरोबरीत राहिले. चौथ्या मानांकित स्पेनने 32 व्या मानांकित क्युबाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी नोंदवली. ऑस्ट्रेलियाने मॅग्नस कार्लसनच्या नेतृत्वाखालील नॉर्वेला 2.5-1.5 फरकाने पराभूत केले, हा स्पर्धेतील मोठा धक्का ठरला.