लष्कराचे वाहन बर्फावरून घसरल्याने कोसळले दरीत ः नियमित सरावादरम्यान दुर्घटना
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील माछल सेक्टरमध्ये लष्करी अधिकाऱयासह अन्य दोघे जवान हुतात्मा झाले. संबंधित तिघेही भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे सैनिक होते. एक जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) आणि 2 सैनिकांचे पथक नियमित मोहिमेवर (पेट्रोलिंग) असताना ही दुर्घटना घडली आहे. बर्फामुळे त्यांचे वाहन घसरून खोल दरीत कोसळल्यामुळे तिघांनाही प्राणाला मुकावे लागले. नायब सुभेदार पुरुषोत्तम कुमार, हवालदार अमर सिंग आणि कॉन्स्टेबल अमित शर्मा अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत.
लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॉरवर्ड एरियामध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे सध्या बऱयाच रस्त्यांवर बर्फ साचलेला दिसून येत आहे. या बर्फामुळे नियमित सरावादरम्यान लष्कराच्या पथकाला मोठा फटका बसला. लष्करी वाहन कोसळून तिघांना प्राण गमवावे लागले. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढले. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तिन्ही जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सध्या माछल सेक्टरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. काही भागात एक फुटापर्यंत बर्फ साचला आहे. गेल्यावषी नोव्हेंबर महिन्यात हिमनदी तुटल्याने येथे तीन जवान हुतात्मा झाले होते. माछल सेक्टरमध्येच गस्त सुरू असताना त्यांच्यावर बर्फाचा डोंगर कोसळला होता. काही जवानांना बर्फाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. ही घटना घडली तेव्हा 56 राष्ट्रीय रायफल्सचे हे पाच जवान नियमित गस्तीवर होते. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र जवानांना बाहेर काढेपर्यंत तिघांचे प्राण गेले होते. यात अनेक जवान गंभीर जखमीही झाले होते.
दोन आठवडय़ांपूर्वीही सिक्कीममध्ये दुर्घटना
सिक्कीममधील जेमा येथे 15 दिवसांपूर्वी लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जवान हुतात्मा झाले होते. लष्करी वाहनांचा एक ताफा शुक्रवारी सकाळी चाटण येथून थांगूकडे जात असताना वाटेत एका वळणावर ट्रक घसरून दरीत कोसळला. या अपघातात अन्य 4 जवान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले होते.