गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह 18 जणांना 6 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. मेवाणी आणि त्यांच्या सहकाऱयांकडून एका रस्त्यावरील वाहतूक रोखून धरण्याशी संबंधित हे प्रकरण होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
न्यायाधीशांनी मेवाणी आणि इतर दोषींना दंडही ठोठावला आहे. तसेच या दोषींची शिक्षा 17 ऑक्टोबरपर्यंत निलंबित केली असून या कालावधीत दोषींना याविरोधात दाद मागता येणार आहे.
काँग्रेस नेते जिग्नेश मेवाणी यांनी 2016 मध्ये गुजरात विद्यापीठानजीक रास्ता रोको आंदोलन केले होते. गुजरात पोलिसांकडून भादंविचे कलम 143 अन् 147 अंतर्गत गुन्हे नोंदविले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता. जिग्नेश मेवाणी यांना यापूर्वी अन्य एका खटल्यातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी मेहसाणा येथे विनाअनुमती मोर्चा काढल्याप्रकरणी मेवाणी यांना तीन महिन्यांची शिक्षा झाली होती.