500 किलोचे अंतराळयान उल्कापिंडाची दिशा बदलणार ः 27 सप्टेंबरला लाव्ह पाहता येणार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची ‘डीएआरटी’ मोहीम 27 सप्टेंबर रोजी एका स्टेरॉयडला अंतराळयान धडकवून त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. डबल एस्टेरॉयड रिडायरेक्शन टेस्ट असे या मोहिमेचे नाव असून ही यशस्वी झाल्यास भविष्यात पृथ्वीला उल्कापिंडांपासून वाचविण्यास मोठी मदत होणार आहे. या मोहिमेत नासा अन् एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची भागीदारी आहे.
500 किलोग्रॅम वजन असणारे डीएआरटी अंतराळयान एका एस्टेरॉयड सिस्टीमला धडकविण्यात येणार आहे. या उल्का पिंडाचे नाव डिडीमॉस असून याच्या उपग्रहाचे नाव डिमोरफोस आहे. डिमोरफोस 11 तास आणि 55 मिनिटांमध्ये डिडीमॉसची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. डिडीमॉसचा आकार 2,560 फूट तर डिमोरफोसचा आकार 525 फूट इतका आहे.
अंतराळयानाला उल्कापिंडाचा मार्ग बदलावा लागणार आहे. डीएआरटी कायनेटिक इम्पॅक्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने डिमोरफोसला 24 हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धडकणार आहे. यामुळे 10 मिनिटांमध्ये ही सिस्टीम तुटणार असून डिडीमॉसची ट्रजेक्टरी बदलणार आहे.
पृथ्वच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेली ही एक सुरक्षा यंत्रणा असल्याचे नासाचे म्हणणे आहे. तर डिडीमॉस उल्कापिंडामुळे पृथ्वीला कुठलाच धोका नाही, परंतु पहिल्यांदाच कायनेटिक इम्पॅक्ट तंत्रज्ञानाद्वारे डीएआरटीचा प्रयोग करण्याची एक चांगली संधी असल्याचे नासाने म्हटले आहे.
अंतराळप्रेमी ही ऐतिहासिक घटना लाइव्ह पाहू शकणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार 27 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी नासा टीव्हीवर ही घटना पाहू शकतील. तसेच नासाच्या फेसबुक, ट्विटर आणि युटय़ूब अकौंट्सवरही याचे प्रसारण केले जाणार आहे.