7 विरूद्ध 6 मतांनी विजयी, दयानंद बोर्येकर पराभूत
डिचोली/प्रतिनिधी
सांखळी नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी काल शुक्रवार दि. 24 जून रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत नगरसेविका ज्योती ब्लेगन यांची निवड करण्यात आली. 13 सदस्यीय या नगरपालिकेत ज्योती ब्लेगन यांचा 7 विरूद्ध 6 मतांनी विजय झाला. विरोधी गटातील नगरसेवक दयानंद बोर्येकर यांनी अर्ज दाखल केला होता.
माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्षपद रिक्त होते. सावळ यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी तत्पूर्वी नगराध्यक्षपदाचा ठरल्यानुसार राजीनामा दिला होता. या नगरपालिकेत सत्तेवर असलेल्या टुगेदर फॉर सांखळी या गटाकडे 13 पैकी 7 जणांचे बळ आहे.
काल शुक्रवारी साखळी नगरपालिका कार्यालयात उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक धर्मेश सगलानी, राया पार्सेकर, राजेंद्र आमेशकर, ज्योती ब्लेगन, अन्सिरा खान व कुंदा माडकर तर विरोधी गटातील दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, शुभदा सावईकर, आनंद काणेकर, रश्मी देसाई यांची उपस्थिती होती. निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांचीही उपस्थिती होती.
दयानंद बोर्येकर यांचा पराभव
उपनगराध्यक्ष पदासाठी ज्योती ब्लेगन व दयानंद बोर्येकर यांनी अर्ज सादर केले होते. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकही अर्ज मागे न आल्याने अखेर निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ज्योती ब्लेगन यांना 7 तर दयानंद बोर्येकर यांना 6 मते मिळाली. निवडणूक अधिकारी दीपक वायंगणकर यांनी ज्योती ब्लेगन यांची निवड जाहीर केली.
जबाबदारी चोखपणे पार पाडणार : ज्योती ब्लेगन
सांखळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष या नात्याने आपण जबाबदारी चोखपणे पार पडताना नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व विकासकामांना सहकार्य केले जाईल. नगराध्यक्ष आणि इतर सर्व नगरसेवकांच्या बरोबरीने विकासाच्या बाबतीत कधीही कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ज्योती ब्लेगन यांनी सांगितले.