प्रतिनिधी /मडगाव
कदंब बसगाड्यातून दररोज प्रवास करणारे प्रवासी कदंब बसगाड्याचे आठवडाभराचे पास घेतात. खास करून मडगाव-पणजी मार्गावर प्रवास करणारे प्रवासी हे पास घेतात. त्यावेळी त्यांना एसी बसगाड्याचे पास कदंब महामंडळा तर्फे दिले जातात. पण, जेव्हा हे प्रवासी प्रवास करण्यासाठी येतात त्यांना बऱ्याचवेळा नॉन एसी बसगाड्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना फसविले गेले का ? असा सवाल उपस्थित होत असतो.
मडगाव-पणजी व पणजी-मडगाव या मार्गावर दररोज प्रवास करणारे असंख्य प्रवासी असतात. खास करून सरकारी नोकरी किंवा खाजगी आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असतो. हे प्रवासी दररोज रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या ऐवजी आठवड्यातून एकदा पास काढतात. हे पास देताना एसी बसगाड्याचे पास दिले जातात. एसी बसगाड्याचे तिकीट शुल्क ही आकारले जाते. पण, बऱ्याचवेळा एसी बसगाड्या उलपब्ध करण्याऐवजी नॉन एसी बसगाड्या प्रवाशांना उपलब्ध केल्या जातात. या सदंर्भात प्रवाशांनी जाब विचारल्यास त्यांना समाधानकारक असे उत्तर मिळत नाही.
कामावर किंवा नियोजित स्थळी वेळेवर पोहचण्यासाठी प्रवाशांना मग नॉन एसी बसगाड्यातून प्रवास करणे भाग पडते. जर एसी बसगाड्या उलपब्ध करता येत नसेल तर एसी बसगाड्याचे पासेस् का पुरविले जातात असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांची अशा प्रकारे फसवणूक करणे अयोग्य असल्याचे मत देखील प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
सकाळी व संध्याकाळी उशिरा नॉन एसी बसगाड्यातून प्रवास करणे एकवेळ समजण्याजोगा भाग आहे. कारण यावेळी गर्मी नसते. मात्र, दुपारच्या वेळी नॉन एसी बसगाड्यातून प्रवास करणे म्हणजे त्रास दायक असते. कारण, दुपारच्यावेळी प्रचंड गर्मी असते. दुपारच्या वेळी तरी कदंब बस महामंडळाने एसी बसगाड्याच उलपब्ध कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.