वार्ताहर /किणये
पारंपरिक वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण करत, हर हर महादेवाच्या जयघोषात बेळगुंदी येथे कलमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात झाली. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस ही यात्रा झाली. यात्रेत भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोमवारी गावातील सर्व देव देवतांची पूजा अर्चा करून कलमेश्वर यात्रेला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी गावात आंबिल गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सुंदर अशा पद्धतीने सजवले होते. बैलांच्या शिंगांना रंग लावण्यात आला होता. बैलांना गुलाल व हार घालून या मिरवणुकीत बैलगाडीला जुंपण्यात आले होते. अगदी उत्साहात ही मिरवणूक गावभर निघाली होती. आपापल्या घरासमोर महिला आरती ओवाळून या मिरवणुकीचे स्वागत करताना दिसत होत्या. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. मंगळवारी सकाळी पुन्हा गावातील सर्व देवदेवतांची पूजा करून यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. बेळगुंदीसह पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेला गर्दी केली होती. यात्रेनिमित्त कलमेश्वर पिंडीची विशेष पूजा केली होती. अनेक भक्तांनी कलमेश्वरांचे दर्शन घेतले.