ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील कांदिवलीमध्ये (Kandivali) भाजपने (bjp) आज सायंकाळी 7 वाजता महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात पोल खोल सभा (Pol Khol Sabha) आयोजित केली आहे. या सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचं काम सुरु होतं. मात्र, या सभेच्या स्टेजचं काम सुरु असतानाच रात्री एकच्या सुमारास शिवसैनिकांनी तोडफोड करत हे स्टेज उद्ध्वस्त केले.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्वमधील रेल्वे स्टेशनसमोर पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात सायंकाळी 7 वाजता पोल खोल सभा आयोजित केली आहे. या सभेला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार प्रमुख प्रवक्ते असणार आहेत. सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचं काम सुरु होतं. दरम्यान, कांदिवलीतील शिवसेनेचे शाखाप्रमुख सचिन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री एकच्या सुमारास या स्टेजची तोडफोड केली. तसेच शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या परिसरात तणावाचे वातावरण असून, सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.