‘ब्राउन’ सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत
अभिनेत्री करिश्मा कपूर मागील काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्री यापूर्वी ‘मेंटलहुड’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. करिश्मा आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा ओटीटी जगतात पुनरागमन करत आहे. करिश्मा चित्रपट निर्माते अभिनय देव यांची आगामी वेबसीरिज ‘ब्राउन-द फर्स्ट केस’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. ही सीरिज ‘सिटी ऑफ डेथ’ नावाच्या पुस्तकावर आधारि तआहे. या क्राइम ड्रामामध्ये करिश्मा एका हेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. करिश्माने सोशल मीडियावर यासंबंधी घोषणा केली आहे.
करिश्माने सोशल मीडियावर स्वतःचा फर्स्ट लुक शेअर करत ‘ब्राउन-द फर्स्ट केस’ची बर्लिनेल सीरिज मार्केट सेलेक्ट्ससाठी निवड झाल्याचे सांगितले आहे. करिश्माच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह दिग्गज कलाकारांनीही कॉमेंट केली आहे. यात करिना कपूर आणि मलायका तसेच अमृता अरोराचाही समावेश आहे. नीतू कपूर, दीया मिर्झा, अथिया शेट्टी आणि शिवानी दांडेकरनेही तिच्या पोस्टवर कॉमेंट केली आहे.
बर्लिनेलसाठी ‘दहाड’ या सीरिजचीही निवड झाली आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह अभिनय करताना दिसून येणार आहेत. याचे दिग्दर्शन रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी केले आहे. ब्राउन, दहाड यांच्यासह भारताने प्रतिष्ठित बर्लिनेल सीरिजमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे.