पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष, आसमंतात घुमणारा ढोल-ताशाचा दणदणाट, रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झालेले बाप्पा, लाडक्या बाप्पाला मोबाइलमध्ये टिपण्यासाठी सरसावलेली तरुणाई, पारंपरिक पोषाक परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त, ‘श्रीं’च्या स्वागतासाठी आलेला वरूणराजा अशा उत्साही व मंगलमय वातावरणात टिळक पंचांगानुसार गणरायाचे रविवारी केसरीवाड्यात आगमन झाले.
केसरीवाडा गणपती मानाचा पाचवा गणपती आहे. ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा असलेल्या या गणपतीची ‘केसरी’चे विश्वस्त- सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक आणि विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक यांच्या हस्ते दुपारी 12.20 वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. रमणबाग चौकातून सकाळी 9.45 वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. रमणबाग चौकातील महेश गोखले व विध्देश गोखले यांच्याकडून ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यात आली. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष झाला. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरूवात झाली.
रमणबाग चौकातून शिंदेपार चौकाच्या दिशेने मिरवणुक वाजत-गाजत मार्गस्थ झाली. श्रीराम आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या लयबद्ध वादनावर भक्तही ठेका धरत होते. कोसळणार्या पावसाच्या हलक्या सरींमुळे ढोल-ताशा पथकातील वादकांत उत्साह संचारला होता. ओंकारेश्वर मंदिर चौक, वर्तक उद्यान, नारायणपेठ पोलिस चौकी आणि केळकर मार्गाने मिरवणूक केसरीवाड्यात आली.
‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, विश्वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, तसेच ‘केसरी’च्या विविध विभागांतील कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. ‘केसरी’च्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते श्रीराम व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचे लयबद्ध वादन. पथकांच्या वादनाने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला.
बिडवे बंधूंच्या चौघडा वादनाने वातावरण अधिक मंगलमय झाले. टिळकवाड्यातील गणेश मंदिरासमोर अभिनव कलाभारतीतर्फे आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. ‘श्रीं’चे टिळकवाड्यात आगमन होताच गणेशभक्तांनी ‘बाप्पा मोरया’चा जयघोष केला. डॉ. प्रणती रोहित टिळक यांनी गणरायाचे औक्षण केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदिपसिंग गील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती रोहित टिळक, रौनक टिळक, कृतिका कुणाल टिळक आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठापनेच्या वेळी कौस्तुभ खळीकर यांनी पौरोहित्य केले. बिडवे बंधूंच्या सनई-चौघड्याचे वादन आणि श्रींच्या मंदिरावरील रंगीबेरंगी पुष्पांच्या सजावटीने वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील भरगच्च कार्यक्रम गणेशभक्तांसाठी खास पर्वणीच असणार आहे.