ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा दुरुस्तीच्या कामामुळे उद्यापासून दीड महिने भाविकांसाठी बंद राहणार आहे. 28 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबरपर्यंत गाभारा बंद असेल. या काळात भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे.
जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. याच खंडोबाचा ऐतिहासिक गड जतन करण्यासाठी पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडून गडावर आवश्यक दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी जवळपास 107 कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार गडावर विकासकामांना वेग आला आहे. खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा दुरुस्तीच्या कामामुळे दीड महिने बंद असणार आहे. भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.
गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत.