व्हेंटिलेटरवर असणारा टाॅवर हिरावून घेतोय लोकांची सुविधा
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील चार नंबर शाळेजवळील भंडारी भवन येथे असलेला बीएसएनएल टाॅवर वारंवार काही ना काही कारणाने बंद राहत आहे. मळगाव येथील टाॅवर बंद झाला की हा टाॅवरसुद्धा त्याच्यावर अवलंबून असल्याने बंद होत असतो. शिवाय या भागातील लाईट गेली तरी हा टाॅवर बंद होतो. या टाॅवरसाठी लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेला जनरेटर वापराविना धूळखात पडला आहे. या टाॅवरला बॅटरी मंजूर करुन मिळावी, यासाठी या भागातील रहिवाशांनी वेळोवेळी बीएसएनएलच्या अधिका-यांकडे मागणी केली. पण या मागणीकडे या अधिका-यांनी लक्ष दिले नाही. आता मोबाईल हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असून या अशा व्हेंटिलेटरवर असणा-या टाॅवरमूळे सर्वांनाच असुविधा होत आहे. या टाॅवरचा लाभ घेणारे ग्राहक काही हजारात आहेत. तेव्हा आता तरी बीएसएनएलच्या अधिका-यांनी व राजकारण्यांनी याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.